वणी टाईम्स न्यूज | : मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे नवविवाहित पती-पत्नीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार 8 जून 2026 रोजी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, करिश्मा व आशीष धानोरकर यांचा विवाह अवघ्या महिनाभरापूर्वी 4 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर दोघेही कुटुंबासोबत आनंदाने राहत होते. मात्र, सोमवारी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य मोटारसायकलने घराबाहेर पडले.
यानंतर गावालगतच्या शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, दोघांनीही आपल्या पोटाला दोरीने दगड बांधून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार शाम वानखेडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. नवविवाहित दाम्पत्याच्या या दुर्दैवी घटनेने सगणापूर गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी प्राथमिक माहितीवर आधारित











