वणी टाईम्स न्युज | गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी रविवारी (७ जून) रात्री एमआयडीसी चौपाटी परिसरात विशेष नाकाबंदी केली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांची नाकाबंदी पाहताच दुचाकीवरून संशयास्पद पद्धतीने जात असलेल्या एका व्यक्तीने भरधाव वेगाने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला असता संशयिताने वाघदरा गावाजवळ दुचाकीवरील चुंगडी रस्त्यावर फेकून अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
पोलिसांनी घटनास्थळी पडलेली चुंगडी उघडून पाहिली असता त्यामध्ये अंदाजे ४० किलो गोमांस आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी गोमांस जप्त करून अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गोहत्या व गोवंश मांस विक्रीवर कायदेशीर निर्बंध असतानाही काही भागांतून गोमांसाची तस्करी सुरू असल्याची चर्चा आहे. विशेषतः तेलंगणा व चंद्रपूर जिल्ह्यातून गोमांस आणले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या साखळीमागे नेमके कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, शहरातील काही ठराविक बिर्याणी सेंटरमध्ये कथितरित्या बीफ बिर्याणी विकली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. मात्र या दाव्यांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गो तस्करी व गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत राज्य शासनाने यापूर्वी निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत वणी परिसरात सुरू असलेल्या कथित तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी व्यापक तपास मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या ४० किलो गोमांसाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील मुख्य तस्करापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना कितपत यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











