वणी टाईम्स न्युज: राज्यातील अनेक महानगर व मोठ्या शहरात सुरु असलेल्या बाईक टॅक्सीवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲपच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सायबर विभाग व पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून संबंधित ॲप्स तात्काळ बंद करण्याची तसेच कंपन्यांच्या मालकांवर FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाचे नियम न पाळता राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, या सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालकांची पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षेसाठी उपाययोजना तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अपुरी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
परिवहन मंत्र्यांनी या अनधिकृत सेवांमुळे परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप्स ऑनलाइन बाईक संचालन तातडीने बंद करून संबंधित ॲप कंपन्या, चालक व व्यवस्थापना विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची निर्देश परिवहन मंत्री यांनी दिले आहे.
ऑनलाईन कॅब बुकिंग पूर्ववत सुरु राहणार
दरम्यान, या अॅप्सच्या माध्यमातून फक्त पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. ओला, उबेर व रॅपिडो या प्लॅटफॉर्म वरून इलेक्ट्रिक बाईक तसेच कॅब, ऑटो आणि फूड डिलिव्हरी सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.










