वणी टाईम्स न्युज : वणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजू उर्फ राजेश वामनराव डफ (54) यांचे बुधवारी दुपारी दुचाकी अपघातात दुःखद निधन झाले. ते कामानिमित्त सकाळीच आपल्या स्प्लेंडर बाईकने झरीजामणी येथे गेले होते. तेथून परत येत असताना दुपारी 3 ते 3.30 वाजता दरम्यान जामणी ते शेकापूर मार्गावर मुच्ची गावाजवळ एका वळणावर त्यांची बाईक स्लिप होऊन ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. असे प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या अपघातात राजू डफ यांचे डोक्यावर आणि चेहऱ्यावर मार लागून जागीच गतप्राण झाले.
अत्यंत मिलनसार आणि खूप मोठा फ्रेंड सर्कल असलेलेले राजू डफ हे नुकतेच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उभे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ असे मोठा आप्त परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच पाटण पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांचे मृतदेहाचे झरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.










