वणी टाईम्स न्युज: शहरात अल्पवयीन व तरुण मुलांमध्ये महागडी व धूम स्टाईल बाईक चालविण्याचा फेड वाढला आहे. आता तर मुंबई प्रमाणे रात्रीच्या वेळी बाईक रेसिंगचा नवा थरार पाहायला मिळत आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वर्दळाच्या रस्त्यावर भरधाव दुचाकी चालवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या बाइकर्सवर कारवाईची अनेक तक्रारींनंतर वणी पोलिसांनी रविवारी सायंकाळी जैन ले-आउट परिसरात धडक कारवाई केली.
नाईट पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना जैन ले आऊट परिसरात दोन तरुण पल्सर-200 बाईकवर रेसिंग करताना आढळले. पोलीस पथकाने दोन्ही बाईक ताब्यात घेऊन कागदपत्र तपासणी केली असता दोन्ही चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रे आढळले नाही. त्यामुळे पोलिसाने चालक सतीश रामदास हिवरकर, रा. छोरिया ले-आऊट चालवत असलेली MH29 CL1790 व सुखदेव सुनील भोयर रा. छोरिया ले-आऊट च्या ताब्यातील MH29 CG8758 या दोन पल्सर 200 बाईक जप्त केली.
शहर पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी दोन्ही वाहने वाहतूक पोलिस शाखेच्या ताब्यात दिले. वाहतूक विभागाने MH29 CL1790 या दुचाकीवर ₹ 12,750/- व MH29 CG8758 या दुचाकीवर ₹2,750 दंड ठोठावला.
🙏पालकांना आवाहन..
शहरात किंवा परिसरात कोणीही रेसिंग (Rash Driving) करू नये. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना रेसिंगसाठी वाहने देऊ नयेत. अन्यथा, कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. असा आवाहन वणी पोलिसांनी केला आहे.










