वणी टाईम्स न्युज: शहरालगत चिखलगाव परिसरात अवैध मटका टपऱ्या, जुगार अड्डे, देशी, विदेशी दारू व गांजाची उघड उघड विक्री सुरु असून यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात चिखलगाव येथील सौरभ धनेश्वर जोशी यांनी वणी पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चिखलगाव ते लालपुलिया या दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका, जुगार, देशी दारू व गांजाचा व्यापार बेधडक सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा खूप आधीच बारमधून विदेशी दारू विक्री केली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या अवैध धंद्यामुळे स्थानिक गरीब नागरिकांवर अन्याय होत असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
यामुळे परिसरातील शांतता भंग होत असून बोधेनगर ते रामदेवबाबा मंदिर परिसरात ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही अर्जदाराने निवेदनात नमूद केले आहे. यासंदर्भात अर्जदार जोशी यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अवैध धंदे बंद न केल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.










