जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर रविवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर येथून तिकीट निश्चित केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेला धानोरकर की वड्डेटीवार हा तिढा सुटला.
भारतीय जनता पक्षाने चंद्रपूर येथून 4 वेळा खासदार व गृह राज्य मंत्री असलेले हंसराज अहिर यांचा पत्ता कापून महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. सुधीर मुनगंटीवार सारख्या भारदस्त नेत्यासमोर कुणीतरी वजनदार उमेदवारच असावा, त्यासाठी मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात खटाटोप सुरू होता.
राज्यात काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार असलेले दिवंगत बाळू धानोरकर यांची पत्नी व भद्रावती वरोरा विधानसभा येथून आमदार प्रतिभा धानोरकर यांना खासदारकीचा तिकीट मिळावा यासाठी चंद्रपूर, वणी आर्णी येथील काँग्रेस नेते व कार्यकर्ते एकवटले होते. मात्र काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी त्यांची मुलगी शिवानी वड्डेटीवार हिला तिकीट मिळविण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली होती.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कुणबी समाजाचा बाहुल्य आहे. कुणबी समाजाच्या एकगठ्ठा मतांमुळे बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. जातीनिहाय समीकरण लक्षात घेऊन मुनगंटीवारच्या मानगुटीवर बसविण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी अखेर आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट फायनल केले. प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीमुळे मुनगंटीवार यांना ही निवडणूक जिंकणे सोपे जाणार नाही, यात तिळमात्र शंका नाही.