जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मोठी राजकीय घडामोडी घडली. माजी खासदार स्व. बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू आणि वर्तमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे अनिल धानोरकर यांनी गुरुवार, 21 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार करण देवतळे अशा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

📍राजकीय परिणाम..
अनिल धानोरकरांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना (UBT), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपासून राजकीय पुनर्वसनाची संधी शोधत अखेर अनिल धानोरकर यांनी भाजपाचा पर्याय निवडला. अनिल धानोरकरांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघावर खासदार प्रतिभा धानोरकर यांचे वर्चस्व कमी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
🔥 धानोरकर कुटुंबात ‘स्प्लिट स्क्रिन’
भद्रावती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असलेले अनिल धानोरकर यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने, धानोरकर कुटुंबात उभी फूट पडली आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर पत्नी प्रतिभा धानोरकर काँग्रेसमध्ये राहून खासदारकी भूषवत आहेत. दुसरीकडे, बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल यांनी मात्र काँग्रेसमधील उपेक्षेमुळे व वंचित आघाडीत अपयश आल्याने अखेर भाजपाचा झेंडा हाती घेतला.
उल्लेखनीय आहे की, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्युनंतर लोकसभा निवडणुकीत धानोरकर कुटूंब एकत्र होते. मात्र विधानसभा निवडणुकीत धानोरकर कुटुंबात कलहचे वातावरण निर्माण झाले. अनिल धानोरकर यांनी कॉग्रेस पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भासऱ्याला डावलून भाऊ प्रवीण सुरेश काकडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी शक्ती पणाला लावली. तेव्हापासून धानोरकर कुटुंबात कलह वाढत गेली.










