वणी टाईम्स न्युज : भारतीय जनता पक्षाच्या वणी शहर अध्यक्षपदी शहरातील ख्यातनाम विधिज्ञ ऍड. नीलेश महादेवराव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे ही घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आणि रणनीतिक मानली जात आहे.
ऍड. नीलेश चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरात सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पक्षाचा गड अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांनी वणी परिसरात विविध सामाजिक उपक्रमांतून आपली ठसा उमटवलेली आहे.
जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी सांगितले की, “पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला विजयी करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती निर्णायक ठरेल. ऍड. नीलेश चौधरी यांच्या रूपाने वणी शहराला एक दमदार नेतृत्व लाभले आहे.”
नवीन शहर अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर ऍड. नीलेश चौधरी यांनी कार्यकर्त्यांचे आणि नेतृत्वाचे आभार मानले. ते म्हणाले, “भाजपचा विचार व योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी काम करेन. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध आहे.”
भाजपच्या या नव्या निर्णयामुळे वणी शहरातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही या नियुक्तीबद्दल उत्साहाचे वातावरण आहे. शहर अध्यक्ष पदावर नियुक्तीनंतर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, जिल्हाध्यक्ष एड. प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय चोरडिया, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर यांनी एड. नीलेश चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.












