वणी टाईम्स न्युज:
वडिलांची शेतीत हिस्सा मागण्यासाठी विवाहितेचा छळ
माहेरून शेतीचा हिस्सा घेऊन ये, नाहीतर घरातून निघून जा. असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार 31 मे रोजी वणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.
पिडीत विवाहितेच्या तक्रारी वरुन पोलिसांनी फिर्यादी महिलेचे पती, दिर, जाऊ व नणंद, सर्व रा. वणी विरुद्ध कलम 34, 498(A), 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
साई मंदिर व शेतकरी लॉन येथून दोन दुचाकी लंपास
साई मंदिर समोर दुचाकी उभी करुन मंदिरात पूजा करिता गेलेल्या इसमाची मोटर सायकल चोरट्याने उडविली. फिर्यादी विनोद देविदास चांदवडकर, रा. टिळकनगर वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे रोजी पहाटे 4.45 वाजता त्यांनी आपली होंडा शाईन मो. सा. क्रं. MH29-BM-3942 यवतमाळ मार्गावर साई मंदिरच्या गेट समोर उभी करून पुजेकरिता मंदिरात गेले होते. पूजा करून मंदिराबाहेर आले असता त्यांची दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी मिळून आली नाही.
दुसऱ्या घटनेत येथील शेतकरी भवन मध्ये आयोजित लग्न प्रसंगात आलेल्या इसमाची मोटरसायकल किंमत 25 हजार अज्ञात चोरट्याने लंपास केली. फिर्यादी आकाश महादेव पारशीवे, रा. सरोदय चौक यांनी दुचाकी चोरी बाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दोन्ही घटने संदर्भात अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 379 भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
बंद घरांवर चोरट्यांचा डोळा
शहरात चोरीच्या घटनेवर अंकुश लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. मुकुटबन मार्गावर निर्गुडा नदीला लागून असलेले मारोती टाऊनशिप मधील धनराज केशव सिडाम हे आपल्या कुटुंबासह चंद्रपूर जिल्ह्यातील आपले मूळ गावी गेले असता त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख 16 हजार असे 65 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
छोरिया वसाहत मधील रहिवासी प्रफुल नरसिंगदास गढीया हे आपल्या मुलाकडे परदेशात जाऊन असल्याने त्यांचे बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ठेवलेले जुने नाणे व अंदाजे 20 हजार रुपये चोरून नेले.
आई वडिलांचा भांडण, अल्पवयीन मुलगा घरुन बेपत्ता
आई वडिलांमध्ये झालेल्या भांडणामुळे त्रस्त अल्पवयीन मुलगा घरून निघून गेला. फिर्यादी खरबडा मोहल्ला येथील वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 मे रोजी रात्री त्यांच्या आपल्या पत्नीसोबत घरगुती कारणाने वाद झाला होता. तेव्हा त्यांचा 14 वर्षाचा लहान मुलगा कोणालाही काही न सांगता घरून निघून गेला. रात्री आणि दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गांजा सेवन करताना तिघांवर गुन्हा
शहरात गांजा व इतर अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक अल्पवयीन व शालेय मुलं अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. ब्राह्मणी फाटा परिसरात एका बारच्या मागे खुल्या जागेवर गांजा अमली पदार्थ ओढताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. उल्हास उमरे(27), गणेश चिंतलवार (31), रवींद्र मरसकोल्हे (35) असे गांजा सेवन करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दीपक टॉकीज परिसरात वरली मटका
येथील दीपक टॉकीज परिसरात नगर परिषद कॉम्पलेक्सच्या मागे खुल्या जागेवर सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन वरली मटका जुगार खेळताना एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. वसीम फरीद शेख (34), रा. पंचशील नगर वणी असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पोलीस शिपाई विजय गुजर यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.