वणी टाईम्स न्युज : दारूची सवयी असलेल्या मुलाला पैसे न दिल्यामुळे मुलाने बापाला थापड बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. शहरातील साने गुरुजी नगर येथे सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेबाबत पीडित वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपी मुलाने त्यांची दुचाकी वर पेट्रोल ओतून तसेच सिलेंडर पेटवून घर व दुचाकी जाळण्याचा प्रयत्नही केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादी अशोक महादेव चटकी (62) हे सेवानिवृत कर्मचारी असून साने गुरुजी नगर येथे राहतात. दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता फिर्यादी वडील घरी असताना त्यांचा मुलगा राहुल अशोक चटकी (32) हा दारू पिऊन घरी आला व मुलीचे शाळेत ऍडमिशन करायचे आहे, असे सांगून 20 हजार रुपये मागितले. फिर्यादी वडिलांनी माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाही, असे म्हटले असता आरोपी मुलाने घरच्या अंगणात ठेवलेली त्यांची फॅशन प्रो मोटरसायकलवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वयंपाक घरातून गॅस सिलेंडर आणून हॉल मध्ये ठेवला व घर जाळून टाकण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी मुलाला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळ करुन थापड बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेच्या वेळी हजर शेजारील काही लोकांनी आरोपी मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यानाही शिवीगाळ व धमकी दिली. आरोपी मुलाकडून जीवितास धोका असल्याची फिर्याद नंतर पोलिसांनी कलम 115(2), 287, 351(2),351(3), 352 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय सुदाम आसोरे करीत आहे.