वणी टाईम्स न्युज : मेव्हण्याच्या रिसेप्शन कार्यक्रमात जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. एस. टी. बसमध्ये प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधील तब्बल 6 तोळा सोन्याचे दागिने अनोळखी महिलेने लंपास केले. मारेगाव ते करंजी दरम्यान सोमवार 12 मे रोजी अहेरी ते माहूर जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली. रिसेप्शनसाठी तयार होण्यासाठी जेव्हा महिलेने आपला पर्स उघडला तेव्हा दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. घटनेबाबत फिर्यादी महिलेनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी ज्योती इंद्रपाल उलमाले (49) रा. मारेगाव हिच्या मेव्हण्याचा लग्नाचे रिसेप्शन असल्याने ती आपल्या मुलीसह करंजी येथे जाण्यासाठी मारेगाव येथून बस मध्ये बसली होती. मुलगी कंडक्टरच्या बाजूच्या सीटवर बसली तर महिला पाठीमागील सीटवर बसलेल्या दोघांना सरकवून त्यांच्याजवळ बसली. फिर्यादी महिलेने तिकीट काढण्यासाठी पर्स उघडून पैसे काढले तेव्हा एक दुसरी महिला तिच्या शेजारी उभी होती.
काही वेळाने करंजी गाव आल्याने फिर्यादी महिला आपल्या मुलीसह बस मधून उतरली. तिथून त्या दोघी भाच्यासोबत दुचाकीने आईचे घरी वाढोणा व नंतर रिसेप्शन करिता सोनुर्ली गावात पोहचल्या. कार्यक्रमात घालण्यासाठी पर्समध्ये ठेवलेली सोन्याची पोत व सोन्याचा पोहे हार काढण्यासाठी पर्स उघडला असता दोन्ही वस्तू मिळून आली नाही. तेव्हा सोन्याची पोत 29 ग्राम व सोन्याचा पोहे हार 30 ग्राम असे एकूण 59 ग्राम सोन्याचे दागिने किंमत 3 लाख 54 हजार बस प्रवास दरम्यान पाठीमागे उभी अनोळखी महिलेनी हातचलाखीने चोरी केल्याची तक्रार महिलेनी मारेगाव ठाण्यात नोंदवली.