वणी टाईम्स न्युज : जीवन विमा पॉलिसीच्या पैश्यासाठी महिलेला अश्लील शिवीगाळ करुन अपमानित करणाऱ्या विमा एजंटला न्यायालयाने एका वर्षाचा कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल 10 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेतील आरोपीचे नाव दीपक गणपत शेंडे, रा. मारेगाव आहे. पांढरकवडा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार मारेगाव येथील वार्ड क्रमांक 6 मधील इसमाच्या जीवन विमा पॉलिसीचे पैसे घेण्यासाठी आरोपी 21 ऑक्टोबर 2015 रोजी रात्री 9 वाजता त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी घरी हजर महिलेने त्याचा पती घरी नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपी यांनी महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ करत अपमान केला. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध एट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची तत्कालीन उप विभागीय अधिकारी माधव गिरी यांनी सखोल तपास करून पांढरकवडा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केला होता. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रमेश मोरे यांनी पीडिता, पीडितेची मुलगी व तपास अधिकारी यांची साक्ष व सबळ पुरावे न्यायालयात सादर केले. पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दीपक गणपत शेंडे, रा. मारेगाव याला 1 वर्ष साधा कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून 7 हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश पारित केले.
सदर खटल्यात अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता रमेश मोरे यांनी खटला चालविला. तर पैरवी अधिकारी म्हणून सहा. पो.उप. निरीक्षक दीपक गावंडे यांनी कामकाज पाहिले. आरोपीची बाजू ॲड. धात्रक यांनी न्यायालयात मांडली.










