जितेंद्र कोठारी, वणी : परसोडा येथे चालु असलेल्या काशी शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी भारतातील अनेक राज्यातील हजारो भाविक सद्य वणी येथे आलेले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नंदनशीवनी येथील चंपाबाई ज्ञानेश्वर जाधव ह्या आपल्या मतीमंद मुलगा माधव ज्ञानेश्वर जाधव (28) सोबत कथा ऐकण्यासाठी 27 फेब्रु.ला आल्या होत्या.
कथेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी 12 वाजता दरम्यान हजारोंच्या गर्दीत त्यांचा मतिमंद मुलगा माधव कुठेतरी निघून गेला. त्यास बोलता येत नसुन स्वतचे नाव सुध्दा सांगता येत नसल्यामुळे कथा स्थळावरील पोलीस नियंत्रण कक्षाला हरविलेल्या इसमाबाबत माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी पोलीस अधिकारी व अमलादार यांना तत्काळ शोध घेण्यास आदेशीत केले. परिसरात शोध सुरु असताना घोन्सा रोड रेल्वे पटरीच्या बाजुला एक मतीमंद इसम बसून असल्याची सूचना पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच API माधव शिंदे, PSI रामेश्वर कांडुरे, PSI गुल्हाने, पोलीस अमलदार श्रीनिवास यांनी घोन्सा रोडवर जाऊन मतिमंद माधव याला कथा स्थळी आणून त्याच्या आई चंपाबाई ज्ञानेश्वर जाधव यांच्या ताब्यात दिले. पोलिसांची केलेल्या या कामगिरी बाबत त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.