राळेगाव प्रतिनिधी : येथील तहसील कार्यालयाचे शासकीय वसाहती परिसरात मिळालेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह प्रकरणी स्था. गुन्हा पथक व राळेगाव पोलिसांनी मारेकऱ्याला 24 तासातच अटक केली. साहेबराव मारोती चव्हाण रा. शांतीनगर राळेगाव असे आरोपीचे नाव आहे. तर मृतकची ओळख चायनीज सेंटरवर काम करणारा नेपाली कुक अर्जुनसिंग असल्याची ओळख पटली आहे. दोघांमध्ये 10-15 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणावरून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच राळेगाव पोलीस ठाणे अंतर्गत बंदर गावात जागेच्या वादावरून झालेल्या खुनाचे आरोपीला एलसीबी पथक व राळेगाव पोलिसांनी घटनेच्या 24 तासाचे आत सोनखासच्या जंगलातून शिताफीने अटक केली होती.
प्राप्त माहितीनुसार धुलीवंदनच्या दिवशी शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना तहसील कार्यालयाच्या शासकीय वसाहतीच्या भिंतीजवळ एक इसम मृतअवस्थेत पडून दिसला. पोलिसांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून खून केल्याचे जाणवले. मृत व्यक्तीच्या शारीरिक वर्णनावरून तो शहरातील शिवतीर्थ समोर फकीरा देवकर यांचे चायनीज सेंटरवर काम करणारा कुक असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी फकीरा देवकर यांना बोलावून विचारपूस केली असता त्याच्या नाव अर्जुनसिंग (30) रा. नेपाल असल्याची माहिती त्यांनी दिली.
राळेगावचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी वेगाने तपास चक्र फिरविले असता राळेगाव येथील साहेबराव चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी अर्जुनसिंग सोबत भांडण झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीवरून स्था. गुन्हा शाखा पथक व राळेगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी भांडणाचा वचपा काढण्यासाठी 25 मार्च रोजी दुपारी दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या कबुलीवरून आरोपीला अटक करून राळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राळेगावचे ठाणेदार रामकृष्ण जाधव, स्था. गुन्हा शाखा पथकाचे सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके, तसेच रालेगाव पो. स्टे. येथील पोउपनि विशाल बोरकर, गोपाल वास्टर, रत्नपाल मोहाडे, विशाल कोवे, सुरज चव्हाण संतोष मारबते यांनी केली.