वणी टाईम्स न्युज : तालुक्यात रेती तस्करीला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या मार्गाने वेगळवेगळ्या वाहनाने दररोज शेकडो ब्रास रेती शहरात येत आहे. अवैधरीत्या रेती वाहतुक करताना वाहन महसूल पथक व पोलिसांच्या नजरेत पडू नये म्हणून तस्कर पारंपरिक ट्रॅक्टर व हायव्हाचे ठिकाणी रंगवलेले, सजवलेले ट्रान्सपोर्ट ट्रक वापरत आहेत, जे मोठ्या अंतरावर माल वाहून नेण्यासाठी वापरले जातात. यामुळे तपासणी टाळता येते असा त्यांच्या मनात गैरसमज आहे. रविवारी पूनवट (पुरड) जवळ महसूल पथकाने पकडलेल्या एका ट्रक वरून हे सिद्ध झाले आहे.
चंद्रपूर येथून घुग्गुस मार्गे विना परवाना रेतीची वाहतूक करताना MH40- CT0769 क्रमांकाचे अशोक लेलँड ट्रकचे पूनवट जवळ पट्टे तुटले. सदर ट्रकमध्ये रेती असल्याची माहितीवरुन वणी महसूल विभागाचे पथक त्या ठिकाणी पोहचले. पथकातील अधिकाऱ्यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात रेती भरून आढळली. ट्रक चालकाला रेती वाहतूक पास व रॉयल्टी संबंधी विचारणा केली असता त्यांनी कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले. तसेच ट्रक व रेती चंद्रपूर येथून यवतमाळ येथे नेत असल्याचे चालकाने सांगितले.
अवैधरीत्या रेती वाहतूक करताना पकडलेला ट्रक हा मो. अशफाक मो. हनीफ अन्सारी या नावाने परिवहन विभागात नोंद असल्याचे कळते. बातमी लिहेपर्यंत महसूल अधिकाऱ्याकडून जप्तीची कारवाई सुरू होती. दुरुस्तीनंतर ट्रक तहसील कार्यालयात आणले जाईल. उल्लेखनीय आहे की यापूर्वी 1 मे रोजी नांदेपेरा बायपासवर अशाच प्रकारचा ट्रक महसूल पथकाने रेतीची अवैध वाहतूक करताना पकडला होता.