वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील पैनगंगा व वर्धा नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या सुरू असलेली अवैध रेती तस्करी दिवसेंदिवस वाढतच आहे. रेतीची तस्करी थांबविण्यासाठी महसूल विभागाने नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात पथक नेमले आहे. मात्र रेती माफियांचा धाडस (किंबहुना सेटिंग) म्हणाव लागेल की चक्क सकाळी 10 वाजता रेती भरलेले वाहन शहरात आणताना त्यांना कोणाचीही भीती वाटत नाही.
नांदेपेरा मार्गाने रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहितीवरुन महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवार 22 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता रेल्वे क्रॉसिंग समोर अयोध्या नगरीजवळ सापळा लावला. सकाळी 10 वाजता दरम्यान नांदेपेरा चौफुली कडून येणारा अशोक लेलँड हायवा ट्रक क्रमांक MH36 AA 1184 महसूल अधिकाऱ्यांनी थांबवून तपासणी केली असता त्यात 5 ब्रास रेती भरून होती. ट्रक चालक यास रेतीची रॉयल्टी व वाहतूक पासची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याची कबुली चालकाने दिली.
महसूल अधिकाऱ्यांनी चालकाचे नावपता विचारले असता त्यांनी आपले नाव अजय आनंदराव कुमरे, C/o ज्ञानेश्वर बोधाने, म्हाडा कॉलनी, दाताला जिल्हा चंद्रपूर सांगितले. तसेच रेती भरलेला ट्रक हा योगेश अरुण मनगटे, पडोली चौक, एमआयडीसी चंद्रपूर यांच्या मालकीचा असून त्यांचे सांगण्यावरून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत असल्याचे बयाण दिले. सदर ट्रक हा अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत असल्याची खात्री पटल्याने अधिकाऱ्यांनी 5 ब्रास रेती व ट्रक जप्त करून एस.टी. महामंडळ डेपो आवारात उभा केला.
सदर कार्यवाही उप विभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, नायब तहसीलदार अशोक ब्राह्मणवाडे, ग्राम महसूल अधिकारी वांजरी नमो आनंदराव शेंडे, ग्राम महसूल अधिकारी गणेशपूर सुमेध अघम, जमादार प्रशांत गोहने, सिपाई गणेश राजूरकर यांनी पार पाडली.
महसूल अधिकाऱ्यांवर ‘पंटर’ चा डोळा
रेती तस्करांनी तहसील कार्यालयापासून तर थेट नदी घाटापर्यंत ‘पंटर स्पॉट’ उभारले आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर या पंटरचा डोळा असते. तहसील कार्यालयातून कोण अधिकारी बाहेर निघाले ? कोणत्या दिशेने निघाले ? कोण अधिकारी रजेवर आहे ? ही सर्व माहिती पंटर मार्फत रेती तस्कर व ट्रक चालकाला मोबाईल वर दिली जाते. रेती भरलेला ट्रक शहरात एन्ट्री करण्यापूर्वी एकाद्या झाडाखाली दुचाकीवर पंटर आपला मोर्चा सांभाळून असतात. कोणतीही संशयास्पद हालचाली लक्षात येताच ट्रक चालकाला अलर्ट करण्यात येते.