वणी टाईम्स न्युज : बिघाड झालेल्या उभ्या ट्रकवर मागून भरधाव मालवाहू पिकअप वाहन आदळला. या अपघातात गंभीर जखमी पिकअप चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वणी घुग्गुस महामार्गावर वागदरा गावाजवळ हा अपघात बुधवार 18 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजता घडला. करण चंदु पुंड (25) रा. पळसोनी असे मृत पिकअप चालकाचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार कोळसा वाहतूक करणारा हायवा ट्रक क्रमांक MH34 AV 2365 मध्ये बिघाड झाल्याने वागदरा गावाजवळ महामार्गावर उभा होता. दरम्यान पुनवट कडून वणीच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH34 FC 5628 च्या चालकाला रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या मध्ये उभा असलेला ट्रक दिसून न पडल्याने भरधाव पिकअप मागून ट्रकवर आदळली. या धडकेत पिकअपकचा समोरील भाग पूर्ण ट्रकच्या खाली जाऊन चुराडा झाला.
या अपघातात पिकअप वाहनाचा चालक करण पुंड हा गंभीर जखमी झाला. चालकाला प्रथम वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे नागपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र नागपूर येथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.










