वणी टाईम्स न्युज : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वणी शहरातील विविध बियर बारवर अचानक छापे टाकून कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. पथकाने गुरुवार 24 जुलै रोजी रात्री अचानक यवतमाळ रोड व मुकुटबन मार्गावरील काही बार मध्ये छापा टाकून कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे वणीतील बार मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही बार चालक वाइन शॉपमधून कमी दरात मद्य खरेदी करून, त्याची अनधिकृतरीत्या बारमध्ये विक्री करत असल्याचे एक्साईज अधिकाऱ्यांना आढळले. तर काही ठिकाणी बिअर, वाईन आणि अनधिकृत स्टॉक साठवलेले आढळले असून, व्यवहारावरील बिलिंग प्रणालीही संशयास्पद होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अमरावती व यवतमाळ विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली असून, अधिकृतरित्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यास संबंधित अधिकारी सध्या टाळाटाळ करत आहेत. “कारवाई झाली आहे, एवढाच आम्ही सध्या सांगू शकतो,” इतक्यावरच त्यांची प्रतिक्रिया मर्यादित राहिली. त्यामुळे या कारवाईमागे काही गौडबंगाल किंवा राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
उल्लेखनीय आहे की, वणी शहर आणि परिसरात शंभरहून अधिक बियर बार व वाइन शॉप उघडले आहेत. यापैकी अनेक बार स्थानिक पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या डोळ्यादेखत नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. काही बारमध्ये अल्पवयीन व्यक्तींची उपस्थिती, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा नसणे आणि ध्वनी प्रदूषणासारख्या तक्रारी वारंवार येत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष सातत्याने होत असल्याची तक्रार आहे. तर काही बार निर्धारित वेळेपेक्षा खूपच उशिरापर्यंत सुरु ठेवण्यात येत असल्याचे उघड झाले. विशेषतः काही ठिकाणी बार पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे.
✒️वणी टाईम्स न्यूज
(अधिकृत तपशील मिळताच पुढील अपडेट्स दिले जातील)










