वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघात निवडणूक रिंगणात उतरलेल्या 10 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विजयाचा दावा करणाऱ्या या उमेदवारांची डिपॉझिट रक्कम निवडणूक आयोगाने जप्त केली. महाविकास आघाडीचे संजय देरकर व महायुतीचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना फक्त आपले डिपॉझिट वाचविण्यात यश आले आहे.
शिवसेना (उबाठा), भाजप, मनसे, वंबआ, बसपा, भाकपा तसेच अपक्ष 6 असे एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र यापैकी विजयी उमेदवार शिवसेनेचे संजय देरकर व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वगळता सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. मनसेचे राजू उंबरकर व अपक्ष उमेदवार संजय खाडे शर्यतीतील उमेदवार म्हणून आखाड्यात होते. जोरदार प्रचार यंत्रणा व मतदार संघात डोअर टू डोअर फिरूनही त्यांना डिपॉझिट वाचविण्यापुरते मतही मिळाले नाही.
वणी मतदार संघात एकूण 2 लाख 20 हजार 746 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. डिपॉझिट वाचविण्यासाठी एकूण मतदानाचे 16.6 टक्का पेक्षा जास्त मते मिळविणे आवश्यक आहे. त्यानुसार कमीत कमी 36 हजार 791 मत घेणे गरजेचे होते. मात्र मनसेचे राजू उंबरकर यांना 21 हजार 977 मते तर अपक्ष संजय खाडे यांना फक्त 7 हजार 540 मतांवर समाधान मानावे लागले.