वणी टाईम्स न्युज : स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने प्रभावी कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना ताब्यात घेऊन एकूण ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सचिन सतोष नगराळे, रा. बोरगाव अहेरी, ता. वणी, ह. मु. न्यू सोमठाणा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर व कार्तिक शंकर साळवे, रा. घुटकाळा वॉर्ड, नेहरू शाळा मागे, चंद्रपूर असे अट्टल चोरट्यांचे नाव आहेत.
दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग व संशयितांची तपासणी करत असताना लालगुडा, वणी परिसरात दोन संशयित इसम फिरताना आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. चौकशीत आरोपींनी घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यावरून वणी पोलीस स्टेशन हद्दीतील ७ आणि भद्रावती पोलीस स्टेशन (जि. चंद्रपूर) हद्दीतील १ असे एकूण ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

आरोपींकडून चांदीचे दागिने, होम थिएटर, टीव्ही, माईक व रोख रक्कम असा एकूण २,०३,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सचिन नगराळे हा सराईत घरफोड्या असून त्याच्याविरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, घुग्गुस, गडचांदूर तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वणी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वणी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्था. गु. शा.), सहा. पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.










