वणी टाईम्स न्युज: ट्रक घेण्यासाठी माहेरहून दिड लाख रुपये आणण्याचा सततचा तगादा लावून विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजुर कॉलरी, ता. वणी येथील 26 वर्षीय पीडित महिलेने पोलीस स्टेशन वणी येथे दिलेल्या तक्रारीवरून विवाहितेच्या पतीसह घुग्गुस येथील सासरकडील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे लग्न 25 डिसेंबर 2023 रोजी घुघुस येथील आशिष सोबत समाजरितीनुसार झाले. लग्नावेळी तिच्या आई-वडिलांनी अंगठी, दागिने तसेच संपूर्ण लग्नखर्च उचलला होता. सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर पती आणि सासरकडील मंडळींकडून किरकोळ कारणांवरून वादविवाद, भांडण तसेच मारहाण सुरू झाली असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
तक्रारदार महिलेनुसार, पतीच्या मोबाईलवर वारंवार येणाऱ्या अनोळखी महिलांच्या फोनबाबत विचारणा केल्याने तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पतीने ‘ट्रक घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून दिड लाख रुपये घेऊन ये’ असा दबाव टाकला. पीडितेने हे पैसे आणणे शक्य नसल्याचे सांगताच तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली. या त्रासामध्ये तिची सासू , आजी सासू व काका सासरे यांनीही पतीला प्रवृत्त करत ‘माहेरून पैसे माग, न आणल्यास तिला सोडून दे’ असे सांगत मानसिक छळ केल्याचा तक्रारीत उल्लेख आहे.
दरम्यान, सततच्या छळाला कंटाळून पीडितेनी आपल्या भावाला माहिती देत 3 मे 2025 रोजी माहेरी आश्रय घेतला. त्यानंतर त्यांनी 17 नोव्हेंबर 2025 रोजी वणी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडा येथेही सुनावण्यात आले, मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन वणी येथे अहवाल पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी प्राप्त जबानी व समुपदेशन केंद्राच्या अहवालावरून पीडित महिलेचे पती, सासू, आजी सासू व काका सासरे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 3(5), 351(2), 351(3), 85 खाली गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.










