वणी टाईम्स न्युज : शिवरात्री निमित्त मित्रासह दुचाकीने शिरपूर येथे महादेव दर्शनाला जाऊन परत गावाकडे जाताना दुचाकी स्लिप होऊन अपघात घडला. वणी यवतमाळ मार्गावर राजूर रिंगरोड जवळ बुधवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान घडलेल्या या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या राजूर येथील तरुणाचा मृत्यू झाला. तन्मय परशुराम पिंपळकर (22) रा. राजूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार राजूर येथील सुमित पांडुरंग मेश्राम (24) हा आपले मित्र तन्मय पिंपळकर सोबत हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH29 CD 1898 घेऊन शिरपूर येथे महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला होता. दर्शन घेऊन शिरपूर येथून परत येताना रात्री 9.30 वाजता दरम्यान न्यू राजूर सिटी जवळ टर्निंगवर दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले. भरधाव दुचाकी स्लिप होऊन खाली पडल्यामुळे मागे बसलेल्या तन्मयाच्या डोक्यावर गंभीर मार लागला.
घटनेची माहिती मिळताच दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तन्मय पिंपळकर याला मृत घोषित केले. फिर्यादी अक्षय एकनाथ पिंपळकर (32) रा. संत रविदास नगर वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी दुचाकी चालक सुमित पांडुरंग मेश्राम विरुद्ध कलम 281, 125 (A), 106 (1) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे.