वणी टाईम्स न्युज : शहरातील साई मंदिर ते नांदेपेरा मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे रेल्वे फाटकावर दररोज भयंकर ट्रॅफिक जाम होत आहे. चिखलगाव व वरोरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे यवतमाळ व वरोराकडे जाणाऱ्या कार, जीप, बस इत्यादी वाहने नांदेपेरा मार्गाने मार्गस्थ होत आहे. वणी रेल्वे स्थानकावरून ये जे करणाऱ्या कोळसा वाहतूक व प्रवासी रेलगाड्यांमुळे दिवसातून 8 ते 10 वेळा रेल्वे फाटक बंद करण्यात येते. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर दोन्ही बाजूने वाहनांची लांबच लांब रांगा लागत आहे.
नांदेपेरा मार्गावर मोठ्या शाळा व कॉलेज आहेत. तसेच मागील दोन तीन वर्षांपासून नवीन वसाहती उदयास आल्या आहे. वारंवार रेल्वे फाटक बंद होत असल्याने स्कूलबस व ऑटो ट्रॅफिक जाम मध्ये अडकून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत अथवा परत घरी येण्यास उशीर होत आहे. या मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी होत असताना ट्रॅफिक पोलिसांची या ठिकाणी ड्युटी राहत नाही.
फाटक उघडल्यानंतर पुढे जाण्याच्या घाईत दुचाकी व ऑटो चालक मोठ्या वाहनांसमोर जाताना अनेकदा अपघातही घडत आहे. तर एकमेकांचे समोर जाण्याच्या कारणावरून चालकांमध्ये वाद निर्माण होत आहे. तसेच जड वाहनांमुळे वाहतूक जामची समस्या अधिक भीषण झाली आहे. नांदेपेरा मार्गावर रस्त्याची दुरावस्था व वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक विभागाने रेल्वे फाटक जवळ कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करावी. अशी मागणी होत आहे.