वणी टाईम्स न्युज : मागील काही महिन्यांपासून वणी पोलीस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 5 महिन्यात 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि ठाणेदार अनिल बेहरानी यांची मुख्यालयी बदली पाठोपाठ शनिवारी डी बी पथकातील 3 पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम असे बदली करण्यात आलेले पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
वणी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे व गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यात वेगळे डिबी पथक (गुन्हा शोध शाखा) तयार करण्यात आले. मात्र मागील एका वर्षापासून डिबी पथकातील काही महाभाग पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध वसुली आणि तोडी करण्याचा सपाटा लावला. रेती तस्कारांसोबत संबंध, रेती चोरी व्यवसायात पोलिसांची भागीदारी, अवैध धंद्यांना पाठबळ देण्याच्या आरोपावरून या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात होती.
अनेक प्रकरणात खाकीवर डाग..!
मटका, जुगार, अवैध दारु विक्री, वाहतूकदार यांच्याकडून पोलिसांची हप्तावसुली काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र गोवंश तस्करी व कत्तलखाना चालकांकडून हप्ता वसुलीचे डाग पहिल्यांदा वणी पोलिसांच्या खाकीवर लागले आहे. शहरात ठिकठिकाणी सूरु असलेले देह व्यवसायालाही पोलिसांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. नुकतेच 27 जानेवारी रोजी शहरातील एका वसाहतीत केलेल्या कारवाईत डिबी पथकाने देह व्यवसाय करणाऱ्या 4 महिला व एक ग्राहकाला ताब्यात घेतले. मात्र आर्थिक व्यवहारातून ग्राहकाला कारवाईतून वगळण्यात आल्याची खमंग चर्चा आहे .