जितेंद्र कोठारी, वणी : विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी नेत्यांकडून ईव्हीएम मध्ये गडबडी झाल्याचे सतत आरोप केले जात आहे. अशातच मतमोजणीच्या आदल्या रात्री वणी शहरात पकडण्यात आलेली बंद पिकअप व्हॅन ईव्हीएम मशीन मध्ये सेटिंग करण्यासाठी आली होती का ? ती गाडी जर पकडली गेली नसती तर खरंच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार जिंकले असते का ? असे अनेक प्रश्न आजही उपस्थित केले जात आहे.


ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुम पासून काही मीटर अंतरावर रस्त्यावर उभ्या बोलेरो पिकअप वाहनाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संशयाच्या आधारावर तपासणी केली. वाहनांमध्ये डिशअंटीना, इन्व्हर्टर व इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्यामुळे ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी वाहन आल्याचा संशय बळावला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले. ‘ईव्हीएम मशीन हॅक करणारे वाहन पकडले’ अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच निवडणुकीत उभे तीन उमेदवारांसह शेकडो कार्यकर्ता रात्री 10 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले होते. मात्र पोलीस चौकशीत पकडण्यात आलेले वाहनांमध्ये खाजगी मोबाईल कंपनीचे टॉवर उभारणीचे साहित्य असल्याचे निष्पन्न झाले.

असो… दुसऱ्या दिवशी मतमोजणीनंतर शिवसेनेचे उमेदवार संजय देरकर विजयी झाले. तर भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. बोदकुरवार यांचा पराभवानंतर विरोधी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते दावा करत आहे की होय.. त्या दिवशी जर ती गाडी पकडली गेली नसती तर, संजीवरेड्डी बोदकुरवार हमखास जिंकले असते.
ईव्हीएम मशीन हॅक किंवा सेटिंग होत असल्याचा दावा निवडणूक आयोगाने वारंवार फेटाळला आहे. मात्र काँग्रेस व इतर पक्ष ईव्हीएम मशीनबाबत केलेल्या आपल्या आरोपांवर ठाम आहे. त्यामुळे शहरात या प्रश्नाची चर्चा होताना दिसत आहे की, ती गाडी पकडली गेली नसती तर, खरंच संजीवरेड्डी बोदकुरवार जिंकले असते का ?
संबंधित बातमी –










