वणी टाईम्स न्युज : ओव्हरलोड आणि जड वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. याबाबत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी भालर रोडवर कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. याबाबत त्यांनी निवेदन देत तालुक्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी केली.
लालगुडा ते उकणी, चारगाव – शिरपूर- शिंदोला, शिंदोला ते येनक, वेळाबाई-मोहदा ते कृष्णानपूर, 18 नंबर पूल -वरझडी -मेंढोली या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही रस्ते नादुरुस्त आहेत, तर काही रस्ते नुतनीकरण, डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी, गरोदर माता, कामगार, विद्यार्थी तसेच इतर सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. या उद्योगाची या रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. सध्या पावसाळा असल्याने खड्डयात पाणी साचले आहेत. त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहे शिवाय प्रवाशांना प्रवासाला विलंब होतो.
रस्त्याच्या धुळीमुळे होतेय पिकांचे नुकसान
तालुक्यातील अनेक रस्ते नादुरुस्त आहेत. आपल्या भागात वेकोलि व विविध उद्योगाची कोळशाची वाहतूक होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ साचली आहे. ही धूळ वाऱ्याने शेतात उडते. त्यामुळे शेतक-यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही तर मोठे आंदोलन केले जाईल.
– संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस
आंदोलन करते वेळी अशोक चिकटे, अरुण चटप, प्रमोद लोणारे, रवि कोटावार, तेजराज बोढे, विकेश पानघाटे, प्रफुल्ल उपरे, कुचनकर, कैलास पचारे, कल्पना मुने, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक नागभिडकर, वंदना आवारी, काजल शेख, मंदा भांगरे, संगिता खाडे, सविता रासेकर, सुरेखा वडिचार, कल्पना मुने, कमल लोणारे, सुशिला कांबळे, अशोक पांडे, अरुण नगराळे, संदीप कांबळे, संदीप ढेंगळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व परिसरातील गावकरी उपस्थित होते.