वणी टाईम्स न्युज : वणी येथून मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या यात्रेकरूसाठी रेल्वे प्रवासाची आणखी एक सोय उपलब्ध झाली आहे. रेल्वे प्रशासनाने शनिवार 12 एप्रिल पासून काजीपेठ जंक्शन ते दादर सेंट्रल पर्यंत स्पेशल साप्ताहिक ट्रेन (07197) सुरु केली आहे. काजीपेठ येथून सकाळी 11.30 वाजता सुटून ही गाडी बल्लारशहा, चंद्रपूर मार्गे सायंकाळी 5.23 वाजता वणी रेल्वे स्थानकावर येणार आहे. ही ट्रेन आदिलाबाद, नांदेड, जालना, औरंगाबाद, नाशिक मार्गे रविवारी दुपारी 1.25 वाजता दादर सेंट्रल येथे पोहचणार आहे.
दादर सेंट्रल येथून ही गाडी काजीपेठ स्पेशल (07198) परत दर रविवारी सायंकाळी 3.25 वाजता सुटून सोमवारी सायंकाळी 4 वाजता वणी रेल्वे स्थानकावर पोहचणार. या ट्रेनमध्ये AC फर्स्ट क्लास, AC 2 टियर, AC 3 टियर सह स्लीपर क्लासचे 8 डब्बे व 4 जनरल बोगी जोडली आहेत.
वणी रेल्वे स्थानाकावरून आदिलाबाद, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, मुंबई जाण्यासाठी दररोज बल्लारशहा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस (11002) ही ट्रेन तर मुंबईहून वणी साठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बल्लारशहा नंदीग्राम एक्सप्रेस (11001) गाडी धावतात. शिवाय धनबाद कोल्हापूर (दीक्षाभूमी एक्सप्रेस), पाटणा पूर्णा एक्स्प्रेस व संतरागाछी ते नांदेड (हजुर साहेब नांदेड एक्सप्रेस) या साप्ताहिक प्रवासी रेल्वे गाड्यांचा वणी रेल्वे स्थानकावर थांबा आहेत.