वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील शिंदोला ते मुंगोली मार्गावर कोळशाची जड वाहतूकमुळे या मार्गाची अक्षरशः चाळणी झाली आहे. रस्त्यावरची धुळीमुळे रस्त्याच्या दोन्हीकडील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती होईपर्यंत या मार्गावर वाहतूक बंद करा अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर व कार्यकर्त्यांनी सोमवारी उप विभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन 15 ऑगस्ट रोजी चक्का जाम करण्याचा इशाराही दिला आहे.
शिंदोला ते मुंगोली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. आंदोलनाची दखल घेत मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मध्यस्थीने वेकोलिने या रस्त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 22 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला होता. रस्त्याचे कंत्राट प्रदान होऊन 6 महिन्याचा कालावधी उलटला असता संबंधित कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. त्यामुळे सबंधित कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणीही मनसेने केली आहे
सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा शेतातील पिक लहान आहे. रस्त्यावरील धुळीमुळे शेतातील पीक पूर्णपणे खराब होत आहे. या संदर्भात 12 जुलै रोजी वेकोलि प्रशासनाला पत्र देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्यावर पाण्याचा छिडकाव करण्याची मागणी केली होती. मात्र वेकोलिने थातुरमातुर टैंकर चालू केले आणि रस्ता ओला न करता वाहतूक चालविण्यास सुरुवात केली.
येत्या 2 दिवसांत या कामाची सुरूवात न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपुर्ण गावकरी व पीडित शेतकऱ्यांना घेऊन स्वातंत्र्य दिनी शिंदोला – मुंगोली मार्गावर बेमुदत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनात नमूद केला आहे. निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका उपाध्यक्ष धिरज पिदूरकर, विलन बोदाडकर, साई उगे, गजानन थेरे, मनोज भलमे, सुरज गावंडे, सुरज काकडे, धिरज बघवा, अभय वनकर यांच्यासह अनेक शेतकरी गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते.