वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील बेलोरो चेक पोस्ट येथे कोळसा वाहतुकीच्या धुळीमुळे सोमवार 19 मे रोजी दुचाकी आणि ट्रकचा अपघात होऊन एक तरुणाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर कोळसा वाहतूक विरुद्ध मनसे आक्रमक झाली आहे. कोळसा वाहतुकीच्या धुळीमुळे रस्त्यावर अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे वेकोलिने उडणाऱ्या धुळीवर व वाहतुकीवर नियंत्रण आणावे.अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वेकोलिच्या क्षेत्रिय महाप्रबंधक यांना निवेदन देऊन केली आहे.
वेकोलि क्षेत्र अंतर्गत कोळशाच्या अनेक खाणी आहेत. या खाणीतून दररोज हजारो टन कोळसा उत्खनन व वाहतूक केली जाते. ट्रकद्वारे कोळशाची वाहतूक करताना कोळशाची बारीक भुकटी उडून रस्त्यावर साचलेली आहे. रस्त्यावरील साचलेली भुकटी साफ करण्याचे व पाणी स्प्रे करण्याचे वेकोलिचे कर्तव्य आहे. मात्र वेकोलिकडून कोळसा धुळीवर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने दररोज लहान सहान अपघात घडत आहे.
वणी घुग्गुस मार्गावर बेलोरा चेक पोस्ट आणि परिसर हे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. याठिकाणी उडणाऱ्या व जमा होणाऱ्या धुळी वर नियमीत पाणी मारणे व अन्य उपयोजना करणे गरजेचे आहे. परंतु वेकोलिच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. यापुढे या ठिकाणी अपघात घडल्यास वेकोलि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करु, असा इशारा मनसेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.
वेकोलि महाप्रबंधक यांना निवेदन देताना मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका उपाध्यक्ष धीरज पिदुरकर, आकाश नाने, गणेश भोंगडे, नत्थु झाडे, राजू तुराणकर, रत्नाकर मिलमिले, गणेश तुराणकर, गौरव बोबडे, अक्षय कुमरे, प्रमोद तुराळे, भिवसेन डंभारे, मंगेश तुरानकर, सुधाकर झाडे, मंगेश बाबडे, संदीप इंगोले यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. निवेदनाची प्रत शिरपूर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.