वणी : खरीप हंगामात झालेल्या पूर परिस्थितीमुळे वणी मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र संबंधित विमा कंपनीकडून अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही. अनेक गावात तर कंपनीकडून पंचनामे व सर्व्हेक्षण ही करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ विमेची रक्कम मिळण्याची मागणी नवनिर्माण सेनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या हेतूने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाते. चालू वर्षापासून तर अवघ्या एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली. या योजनेत अधिसूचित पिकांना पेरणीपासून पिकांच्या काढणीपश्चातही विमासंरक्षण आहे. खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट नोंद झाली आहे. मात्र संबंधित विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप विमेची रक्कम देण्यात आली नाही.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून मनसे नेते राजू उंबरकर यांनी मारेगाव येथे रिलायन्स पिक विमा कंपनीला भेट दिली. मात्र कार्यालयातील विमा प्रतिनिधी हे कृषी पदवीधर नाही तसेच त्यांना मराठी भाषा नीट येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याशी संवाद साधण्यास अडचण होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी रिलायन्स विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून विमा कार्यालयात कृषी पदवीधर व मराठी भाषिक प्रतिनिधी नियुक्त करण्याची सूचना केली.
तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देताना मनसे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शहराध्यक्ष शिवराज पेचे, रमेश नक्षीने, रितिक नक्षीने, धीरज बगवा, सुरज काकडे, वैभव पुराणकर उपस्थित होते. निवेदनाची प्रत कृषी मंत्री, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा कृषी अधीक्षक यांना पाठविण्यात आली आहे.