वणी टाईम्स न्युज : शहरातील मोबाईल विक्री व दुरुस्ती दुकानांवर रविवारी दुपारी 4.30 वाजता पासून अचानक ग्राहकांची गर्दी वाढली. आलेले बहुतांश ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल पासून कॉल लागत व येत नसल्याची तक्रार दुकानदाराकडे मांडली. मात्र हा मोबाईलचा बिघाड नसून मोबाईल जिओचे नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यामुळे कॉल लागत नसल्याची बाब दुकानदारांनी सांगितल्यानंतर ग्राहकांमध्ये जिओ सिमकार्ड कंपनी बाबत रोष निर्माण झाला.
शहरात हजारो मोबाईल धारक जिओ कंपनीचा सिमकार्ड वापरतात. रविवारी दुपारी 4.30 वाजता पासून जिओ सिमकार्ड असलेल्या मोबाईल वरून कॉल येणे जाणे बंद झाले. मोबाईल धारकांनी अनेक वेळा मोबाईल बंद चालू करून बघितले. तसेच सिमकार्ड काढून परत टाकून पाहिले. मात्र कोणालाच कॉल लागत नव्हते. शेवटी आपल्या मोबाईलमध्येच बिघाड झाल्याची तक्रार घेऊन मोबाईल दुकानात पोहचले. मात्र दुकानदारांनी सांगितले की जियो कंपनीचे मोबाईल नेटवर्क मध्ये बिघाड असल्या कारणाने इन्कमिंग व आऊटगोईंग कॉल बंद आहे. सायंकाळी 7 वाजे पर्यंत ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.
जिओचा नेटवर्क खंडित होण्यामागे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.कंपनीकडून ही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र तांत्रिक बिघाड यामागचे कारण असल्याचे सांगितले जाते.