जितेंद्र कोठारी, वणी : वणी येथून शिंदोला ते शिंदोला माईन्स पर्यंत एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उप विभागीय अधिकारी वणी व राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
शिंदोला ते शेवाळा दरम्यान खराब रस्त्यामुळे काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील एस. टी. फेऱ्या बंद करण्यात आली होती. परंतु बस सेवा बंद झाल्यामुळे येनक, येनाडी, चनाखा, चिखली, शेवाळा, परमडोह आणि टाकली गावातील विद्यार्थी, महिला व इतर प्रवाश्यांना शिंदोला, वणी येथे ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे.
सद्य स्थितीत शिंदोला ते गोवारी मार्गे शिंदोला माइन्स रस्ता योग्य स्थितीत आहे. त्यामुळे या मार्गावर बससेवा सुरु केल्यास शालेय विद्यार्थ्यांना सोयीचे होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिंदोला माइन्स पर्यंत बस सेवा तात्काळ सुरु न केल्यास ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजय निखाडे यांनी दिला आहे