जितेंद्र कोठारी, वणी
तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा गोड होणार आहे. बहिणीच्या खात्यात 4 हजार 500 रुपये जमा होऊन अवघ्या काही दिवस झाले नाही तर आणखी 3 हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज बहिणीच्या किंवा दाजीच्या मोबाईलवर झळकायला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक महिलांनी त्यांच्या बँक खात्यात 3 हजार जमा झाल्याची पुष्टि केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत बहिणींना मनसोक्त खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.
मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला उद्दंड प्रतिसाद मिळाला आहे. ज्या महिलांनी जुलै मध्ये नोंदणी केली त्यांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे 4 हजार 500 रू. जमा झाले. आणि आता आचार संहिता लागण्यापूर्वी सरकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांची आगाऊ रक्कम बहिणीच्या खात्यात जमा करत आहे. 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजची ओवाळणी मिळणार आहे
पैसे मिळण्यास केवायसीचा अडथळा
तालुक्यात शेकडो बहिणीच्या बँक खात्यावर आधारकार्ड किंवा मोबाईल नंबर जोडून नाही. तर अनेक बहिणीचे बँक खाते मागील अनेक वर्षापासून व्यवहारात नसल्याने बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येत नाही. खात्यावर आधार सिडींग करण्यासाठी बँकांमध्ये महिलांची रांगा लागल्या आहेत. तर आधार अपडेट केंद्रावरही महिलांची गर्दी आहे.