वणी टाईम्स न्युज : ईव्हीएम मशीन ठेवून असलेले शासकीय गोडावून (Strong Room) परिसरात गुरुवारी सायंकाळी संशयास्पद व्हॅन आढळल्या प्रकरणी पोलीस विभागाची मोठी चूक असल्याचे बोलले जाते. स्ट्राँगरुम पासून 100 मीटर परिसरात एक बंद बॉडी व्हॅन 2 ते 3 तासापासून उभी असताना पोलिसांनी त्याची साधी चौकशी करण्याची तसदी घेतली नाही.
गुरुवारी रात्री घडलेल्या प्रकरणानंतरही निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाने दुसऱ्या दिवशीही दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. शुक्रवारी स्ट्राँगरुम पासून 100 मीटरचे आत वरोरा रोडवर रस्त्याच्या बाजूला ऑटो आणि इतर खाजगी वाहनाचा गराडा असल्याचे दिसून पडले. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेबाबत देशभरात वाद सुरु असताना वणी येथे उघडकीस आलेले प्रकरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याची चर्चा आहे.
शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ईव्हीएमच्या सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये. याची काळजी प्रशासनाने घेणे गरजे आहे. निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी व वाहतूक पोलिसांच्या गाड्या दिवसभर या मार्गावर चकरा मारत असताना प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांना हटविण्यात आले नाही.
निवडणूक काळात सर्व्हेक्षण करण्यासाठी अनेक अनोळखी लोकांनी शहरात प्रवेश केले आहे. शहरातील हॉटेल, लॉज मध्ये या लोकांनी लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह ठाण मांडले आहे. परंतु निवडणूक विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडे या लोकांची माहितीच नाही. त्यामुळे शहरातील सर्व हॉटेल, लॉज आणि खाजगी ठिकाणी थांबलेल्या या सर्व्हेक्षण पथकांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
संबंधित बातमी