वणी : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर येथे ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेलावाच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या मार्फत दिनांक 9 आणि 10 डिसेंबरला नागपूर येथे भव्य असा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे आयोजित या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नागपूरसह विदर्भातील 38 हजार 800 तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच ऑनस्पॉट नोंदणीसाठी 50 हून अधिक काउंटर राहणार आहेत. या मेळाव्यात कुशल – अकुशल आणि अर्धकुशल तांत्रिक, अतांत्रिक क्षेत्रातील व प्रोफेशनल रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. तसेच किमान 10 वी, 12 वी पास – नापास तसेच पदविका, पदवी – पदव्युत्तर धारकांना देखील संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
‘नमो महारोजगार मेळाव्यात देशभरातील नामांकित 300 हून अधिक कंपन्या रोजगार देण्याच्या दृष्टीने उपस्थित राहणार आहेत. यात फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तरी या मेळाव्यात सहभागी होऊन विदर्भातील युवक-युवतींनी आपले करिअर घडवण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.