वणी टाईम्स न्युज : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी यांच्या वतीने दरवर्षी आयोजित ‘ग्रामगीता जीवन-विकास परीक्षा’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून वणी तालुक्यातील राजूर (ईजारा) येथील सुनीता भोजराज कारेकर यांनी ‘ग्रामगीताचार्य’ ही मानाची पदवी प्राप्त केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे पार पडलेल्या भव्य समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

घरगुती जबाबदाऱ्या, सामाजिक कार्यातील सहभाग आणि कुटुंबीयांची जबाबदारी पार पाडतही सुनीता कारेकर यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, निष्ठा आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ग्रामगीतेचे सखोल अध्ययन करून जीवनमूल्यांचे आचरणात रूपांतर केले.
त्यांनी मिळालेल्या यशामागे त्यांचे वडील स्वर्गीय दादाजी भोयर गुरुजी यांचा मोठा वाटा असल्याचे सुनीता कारेकर अभिमानाने सांगतात. ते आयुष्यभर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी व शिक्षक म्हणून सेवाभावी कार्य करत राहिले. “हे यश त्यांच्या संस्कारांचे फळ आहे,” असे कारेकर यांनी भावनिक शब्दांत सांगितले. परीक्षेच्या तयारीदरम्यान त्यांना ग्रामगीताचार्य अतुल खापणे यांचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे अभ्यासाला योग्य दिशा मिळाली आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.
पदवीदान समारंभात सुनीता कारेकर यांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक समाज, महिला मंडळे आणि शुभेच्छुकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, वरोरा, महिला भजन मंडळ भांदेवाडा वसाहत, तसेच सर्व कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या वतीने सुनीता भोजराज कारेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.










