जितेंद्र कोठारी, वणी : गुरुदेव सेवा मंडळ व माऊली परिवार शिंदोलाचे वतीने दरवर्षीप्रमाणे श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ व व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 डिसेंबर ते 15 डिसे. पर्यंत शिंदोला येथील बोबडे लेऑउट मध्ये आयोजित या कार्यक्रमात भजन, कीर्तन, प्रवचन, मार्गदर्शन, व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती सम्राट भागवताचार्य ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे (ईसापुर) यांच्या अमृतवाणीतून भाविकांना भागवत कथा ऐकायला मिळणार आहे.
भागवत सप्ताह दरम्यान दररोज सकाळी 6 वा. ध्यानपाठ, 6.30 वा. सामुदायिक प्रार्थना व 7 वा. ग्रामसफाई करण्यात येणार आहे. दिनांक 16 डिसे. रोजी सकाळी 8 वा. ग्रंथ दिंडी व दुपारी 12.30 वा. काल्याचे कीर्तन व 3 वा. महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिनांक 11 डिसे. रोजी दुपारी 12 वाजता पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील हे आपलं गाव सुंदर गाव, व्यसनमुक्त गाव या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तरी तालुक्यातील सर्व भाविक भक्त, सरपंच, उप सरपंच, ग्रा. पं. सदस्य, यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन माऊली परिवार शिंदोलाच्या वतीने करण्यात आले आहे.