जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभेसाठी भाजपचा तिकीट यंदा भैयाला की भाऊला ? अशी चर्चा मागील काही दिवसांपासून शहरात रंगली होती. चार वेळा खासदार तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री पद भूषविणारे हंसराज अहिर यानांच पक्षश्रेष्ठी तिकीट देणार. असा अंदाज बांधला जात होता. मात्र लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीत चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातून हंसराज अहिर यांचे नाव डावलून राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आला.
चंद्रपूरचे स्थानिक गणित लक्षात घेऊन भाजपने मुनगंटीवार यांना तिकीट देण्याचा जुगार खेळला आहे. कारण भाजपसाठी चंद्रपुरात प्रतिष्ठेची लढाई आहे. मागील निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या बाळू धानोरकर यांनी भाजप उमेदवार हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव करून ‘काँग्रेसमुक्त’ राज्याचे भाजपचे स्वप्न भंगविले. 4 वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेल्या नेत्याचा पराभव भाजप नेतृत्वाला चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे यंदा तगडा उमेदवार देऊन चंद्रपूर पुन्हा मिळवायचं या हेतूनं भाजपच्या नेतृत्त्वानं मुनगंटीवार यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते.
सुधीर मुनगंटीवार फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. आता शिंदे मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश आहे. मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना उमेदवारी दिल्यास चंद्रपूरची जागा पुन्हा मिळवली जाऊ शकते, असा भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे.
अशी आहे मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द….
सुधीर मुनगंटीवार 1987-88 सालापासून राजकारणात सक्रिय आहेत. 1989 मध्ये मुनगंटीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविली होती. मात्र काँग्रेसचे माजी अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1991 या वर्षी मुनगंटीवार पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तेव्हा देखील काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनीच मुनगंटीवार यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. आर्य वैश्य (कोमटी) या अल्पसंख्याक समाजातून येणारे मुनगंटीवार यांना लोकसभेची पायरी चढणे कठीण आहे, हे लक्षात येताच त्यांनी 1995 मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी राज्याचे माजी राज्यमंत्री काँग्रेस नेते शाम वानखेडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुनगंटीवार यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेक करून पायऱ्या चढत गेले. 1999 मध्ये युती सरकारच्या काळात सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक विभागाचे मंत्री झाले. त्यानंतर 2004, 2009, 2014 व 2019 अशा सलग निवडणुका जिंकल्या. मतदार संघ पुनर्रचनेत मागील तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी बल्लारपूर मतदार संघातून निवडणूक लढवून विजय संपादन केला. राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ खात्याचे मंत्री तसेच वनमंत्री म्हणून यशस्वी काम केले. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले आहे.