वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचे निवडणूक चिन्ह शिट्टी आता गाव खेड्यात वाजायला लागली आहे. शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी झरी तालुक्यातील मुकुटबन येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून जोरदार रैली काढली. रैलीत मुकुटबन व झरी येथील कार्यकर्त्यांनी वाजविलेल्या शिट्टीच्या आवाजाने संपूर्ण मुकुटबन गाव निनादून गेले. यावेळी संजय खाडे यांच्यासोबत माजी आमदार विश्वास नांदेकर, काँग्रेस नेते नरेंद्र ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल यांच्यासह झरी तालुक्यातील शिवसैनिक व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते
संजय खाडे यांचे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार विश्वास नांदेकर म्हणाले की मी कडवट शिवसैनिक आहे. गेल्या 30 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. अनेक वर्षांपासून राबणाऱ्या शिवसैनिकाऐवजी गेल्या चार महिन्यात सक्रिय झालेल्या उमेदवाराला तिकीट देऊन निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय झाला. त्यामुळे मी संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याच्या निर्णय घेतला आहे. या लढाईत निष्ठावंत शिवसैनिक माझ्या सोबत आहे.
काँग्रेस नेते नरेंद्र ठाकरे म्हणाले की गेल्या 62 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला वणी विधानसभेतून 57 हजारांची लीड असतानाही ही जागा उबाठाला गेली. हा काँग्रेसच्या प्रामाणिक कार्याकत्यांवर अन्याय आहे. संजय खाडे हे धडाडीचे व सर्वसामान्य कुटुंबातून येणारे कार्यकर्ते आहे. त्यांच्या कार्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या लढाईत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सोबत आहे. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रसाद ठाकरे, प्रवीण बद्दमवार, समाधान कुनाटकर, निलेश बेलेकर, वासुदेव देठे, बंडू देवाळकर, चेतन बरशेट्टीवार, प्रणिता घुगुल, सुरेखा भोयर, किरण नांदेकर, खडकीचे सरपंच सौ. लोढे, अतुल निखाडे, प्रमोद डवरे, विठ्ठल पोटे, अरुण येनगंटीवार, उमेश चुक्कलवार, राहुल जलेलवार, महेश सिद्धमवार, जगदीश बोर्डावार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
मुकुटबन येथील रॅलीनंतर संजय खाडे यांचा प्रचाराचा ताफा रुईकोट, अर्धवन, मार्की व तेथून झरी येथे पोहोचला. झरी येथे बिरसा मुंडा चौकात संजय खाडे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संजय खाडे यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्यांनी संपूर्ण झरी तालुक्यात आपचे कार्यकर्ते पाठिशी राहणार असे वचन दिले.
गोंडवाना संग्राम पक्षाचा संजय खाडे यांना पाठिंबा
गोंडवाना संग्राम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन मसराम यांनी पत्र लिहून संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. धडाडीचे नेते, लोकांच्या समस्येची जाण असलेले लोक विधानसभेला जायला पाहिजे, हा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांनी आपला पाठिंबा संजय खाडे यांना जाहीर केला. गोंडवाना संग्राम पार्टीचे नेते बंडू सिडाम यांनी वणीतील प्रचार कार्यालयात सदिच्छा भेट देत पाठिंब्याचे पत्र संजय खाडे यांना सुपुर्द केले. यावेळी बंडू सिडाम यांनी पक्षाचे वणी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व नेते संजय खाडे यांचा प्रचार करणार असे वचन दिले.