वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकीत वणी मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण ताकतीने निवडणूक लढली. मतदार संघात मनसेने केलेले काम पाहता विजय निश्चित असल्याची खात्री होती. परंतु मतदारांनी सर्व कामाला व पक्षाला बाजूला सारून मतदान केले. त्यामुळे निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. जनतेने दिलेले कौल आम्ही मान्य करून पुढे जाण्याचा तयारीत आहे. निवडणुकीत ज्या 22 हजार मतदारांनी मला मतदान केले, त्या सर्व मतदारांचे, पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, मनसे सैनिक, सामाजिक संघटना यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. असे उदगार मनसे नेते राजु उंबरकर यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी पक्ष कार्यालय शिवमुद्रा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक स्वबळावर लढणार
येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर संपूर्ण ताकदीनिशी लढणार आणि जिंकणार, असा दावाही राजू उंबरकर यांनी पत्रकारांसमोर केला.
मी रडणारा नाही तर लढणारा माणूस – राजू उंबरकर
निवडणुकीत झालेला पराभव हा मला संपविणारा नाही. आजवर अनेकदा मला पराभवाला सामोरे जावे लागले. यासर्व पराभवानंतर मी कधी खचलो नाही. पराभव झाला म्हणून कधी रडलो नाही. रणांगण सोडून कधी दूर गेलो नाही. उलट पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो. कारण हा मतदारसंघ माझा परिवार आहे. येथील प्रत्येक जन माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. गेली 20 वर्षापासून मी येथील माता– भगिनी, युवक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सर्वसामान्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढत आलो. त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी येथील व्यवस्थेशी भांडत आलो. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरलो, तुरुंगवास सुद्धा भोगला. आणि जनसेवेचा हा यज्ञकुंड अविरत चालू ठेवला.