जितेंद्र कोठारी, वणी : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षातील अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात वेगवेगळे आयोजन, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून इच्छुक नेते मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच नवरात्री मध्ये होणाऱ्या रास गरबा आयोजनावर ही निवडणुकीचे रंग चढल्याचे दिसत आहे. महिलावर्ग व तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने राजकीय पक्षातील नेत्यांकडून शहरात ठिकठिकाणी गरबा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मनसे नेते राजू उंबरकर यांची वणी विधानसभा मतदार संघातून मनसेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजु उंबरकर यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही राम शेवाळकर परिसरात भव्य गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणून 10 ऑक्टो. रोजी तारक मेहता का उलटा चष्मा या प्रख्यात हास्य मालिकेतील अभिनेता दिलीप जोशी (जेठालाल) स्पर्धकांसोबत गरबा खेळणार आहेत. शिवाय आणखी काही सेलिब्रिटींना आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहे.
वणी येथील प्रख्यात सराफा व्यावसायिक व भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांचे नाव भाजपचे संभाव्य उमेदवाराच्या यादीत असल्याची चर्चा आहे. विजय चोरडिया यांच्यावतीने यवतमाळ मार्गावर चोरडिया कॉम्प्लेक्स या ठिकाणी भव्य रास दांडिया आयोजनाची तयारी सुरू आहे. त्यासाठी शहरात बाजोरिया हॉल, शेतकरी लॉन, विराणी हॉल व अक्सिस बँक समोर रेयांश कलेक्शन असे 4 ठिकाणी गरबा नृत्य प्रशिक्षण क्लासेस सूरु आहे. त्यांच्या गरबा उत्सवात गुलाबी साडी फेम प्रख्यात गायक संजू राठोड व इतर काही सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहे.
झरीजामणी तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा वसंत जिंनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगेसुद्धा विधानसभा निवडणूकीची तयारीत लागले आहे. वणी उप विभागात शेतकरी न्याय यात्रेनंतर खुळसंगे यांनी गरबा आयोजनात उडी घेतली आहे. त्यांच्या वतीने 3 ते 10 ऑक्टबरपर्यंत शेतकरी हॉल येथे निःशुल्क राजे गरबा प्रशिक्षण व नृत्य उत्सवाचे फलक शहरात लावण्यात आले आहे. त्यांच्या या कार्यक्रमात अप्सरा आली फेम सोनाली कुलकर्णी व महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील शिवाली परब या अभिनेत्रींना बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
मतदारांसोबत संपर्क साधण्याची राजकीय नेत्यांची धडपड पाहता नवरात्री आणि गरबा उत्सवावर निवडणुकीचे रंग चढल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र या निमित्ताने शहरातील नागरिकांचे चांगले मनोरंजन व सेलिब्रिटींना बघण्याची संधी मिळणार आहेत.