वणी टाईम्स न्युज : राज्यातील शेतकरी, कर्मचारी, व्यापारी तसेच सर्व सामान्य नागरिक केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे कंटाळले आहेत. राज्यातील शिंदे सरकार हा शेतकरी विरोधी सरकार आहे. बळीराजा आत्महत्या करीत असताना सरकार शेतमालाला तोडका भाव देत आहे. राज्यात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनता महायुतीला धडा शिकवणार, आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता बसणार. असे प्रतिपादन यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ते आज वणी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट रॅलीमध्ये स्टार प्रचारक म्हणून बोलत होते.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी रविवारी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी खा. संजय देशमुख यांनी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका केली. जातिजातीत तेढ निर्माण करून राजकारण करणे भाजपची संस्कृती आहे. महायुतीचे ध्येय धोरण शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या रॅलीत मतदारसंघातील हजारों नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रचार रथावर खा. संजय देशमुख, माजी आमदार वामनराव कासावार, संजय निखाडे, वर्षा निकम, राजीव कासावार, आशिष खुळसंगे तसेच मविआ चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रचार यंत्रणेच्या शेवटच्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आपली संपुर्ण ताकद पणाला लावत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय देरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल लोकसभेप्रणाने लागल्यास आश्चर्याची बाब राहणार नाही.