वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. महायुतीच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून शेतकऱ्यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केले. शेतकऱ्यांच्या भरवश्यावर महायुती सत्तेत आली. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर नेत्यांना कर्जमाफीचे विसर पडले. बजटमध्येही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कोणताही विषय मांडण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्याची कर्ज माफी कधी करणार ? असा प्रश्न वणी तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे. शेती करिता झालेला खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ जुळून नाही राहिला. खर्चापेक्षा उत्पन्न कमी असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामातील शेती कशी करायची व शेतीला खर्च कसा लावायचा या विवंचनेत शेतकरी आहे. काँग्रेस कमिटीने वणी झरी, मारेगाव परिसरात दौरा करून माहिती गोळा केली असता परिसरातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र दिसून पडले.
बी – बियाणे व खताच्या किमतीत झालेली वाढ, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, शेतीकरिता मजुरांची कमतरता , मजुरीचे दरात झालेली वाढ या कारणामुळे शेतकऱ्यांकडे घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत राहिली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी पुढील शेती कशी करायची ? बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? मुलीचे लग्न आणि बारा महिन्यांचा शेतीचा व घरचा प्रपंच कसा चालवायचा या विवंचनेत आत्महत्येला सुद्धा सामोर जात आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले .येत्या पंधरा दिवसात जर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देतेवेळी एड. राजीव कासावार, प्रा. टिकाराम कोंगरे, ओम ठाकूर, मोरेश्वर पावडे, रुपेश ठाकरे, वंदना धगडी, उत्तम गेडाम , राजेंद्र कोरडे, अनंतलाल चौधरी, प्रशांत गोहकार, विकी पानघाटे, प्रमोद लोणारे दिलीप पिदूरकर, सचिन पिदूरकर, रवींद्र होकूम यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते