वणी टाईम्स न्युज : गुजरातमधील अहमदाबाद शहरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनकडे जाणारं प्रवासी विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत कोसळलं. हा अपघात अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीसह 169 भारतीय व 53 ब्रिटिश प्रवाशांसह 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर असल्याचं सांगितलं जाते.
प्राथमिक माहितीनुसार अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून एअर इंडियाचे AI-171 ड्रीमलाईनर विमानाने दुपारी 1.38 मिनिटांवर लंडन जाण्यासाठी टेकऑफ केला होता. मात्र टेक ऑफनंतर काही तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचा ताबा सुटला आणि ते थेट शहरातील गजबजलेल्या भागात कोसळून विमानात आग लागली. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली असण्याची शक्यता आहे.
अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जळलेल्या विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
डॉक्टर्स हॉस्टेलवर कोसळला विमान ..!
प्राथमिक माहितीनुसार विमान ज्या बिल्डिंगवर कोसळला त्या बिल्डिंगमध्ये 50 ते 60 शिकाऊ डॉक्टर राहत होते. विमान बिल्डिंगवर कोसळल्यामुळे सर्व डॉक्टर ठार झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.