जितेंद्र कोठारी, वणी : राज्य विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता पासून होणार आहे. मतमोजणी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केले आहे. मतमोजणी परिसरात कोणालाही कॅमेरा व मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अधिकृत ओळखपत्राशिवाय अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, प्रतिनिधी, पत्रकार कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही. मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील 100 मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल. तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परिसरातील सर्व दुकाने, आस्थापना, व्यवसाय केंद्र बंद राहतील.
शहरातील वरोरा मार्गावर शासकीय धान्य गोडाऊन मध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेसह 3 पोलीस निरीक्षक, API व PSI स्तराचे 12 अधिकारी, 140 पोलीस कर्मचारी, सीमा सुरक्षा बल (BSF) ची एक प्लाटून व आंध्रप्रदेश राज्य राखीव पोलीस बल (ASRPF)ची एक तुकडी असा तगडा बंदोबस्त मतमोजणी परिसरात राहणार आहे.
मतमोजणी परिसरात हुल्लडबाजी, नारेबाजी करणे किंवा सोशल मीडियावर चुकीची माहिती व अफवा पसरविणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वणी विधानसभेतील सर्व नागरिकांनी मतमोजणी दरम्यान शांतता बाळगावी. असे आवाहन निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.