जितेंद्र कोठारी, वणी : प्रख्यात समाजसेवी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील घोंसा येथे 1 सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. पारसमल चोरडिया स्मृती फाऊंडेशन व इंडीयन रेडक्रॉस सोसायटी (सब डिस्ट्रिक्ट ब्रांच वणी ) यांचे संयुक्त विधमाने तसेच कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम व चोरडिया हॉस्पिटल वणी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात मोफत आरोग्य व नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणीनंतर ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, त्या रुग्णांची सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात येईल. रुग्णांना सेवाग्राम येथे नेणे आणणे, औषध,भोजन व राहण्याची सर्व व्यवस्था समाजसेवी विजय चोरडिया तर्फे करण्यात येईल. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जाईल.
घोंसा येथील गजानन महाराज मंदिरात आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे. आरोग्य शिबिरा बाबत अधिक माहिती करिता राजू रिंगोले (9284881655), अक्षय वैद्य (8408809141) व सचिन क्षीरसागर (8308340293) यांच्याशी संपर्क साधावा.