जितेंद्र कोठारी, वणी : ‘स्थळ’सांगून आलं की मुलीच्या घरात उडणारी धांदल, पाहुण्यांची ऊठबस करताना पार, हात-पाय धुण्यासाठी नवीन साबण, नवीन नॅपकिन, पाहुण्यांसह त्यांच्याबरोबर मुलगी पाहण्यासाठी आलेल्या इतर जबाबदार (?) माणसांची बिनकामाची फौज पाहता त्यांच्यासाठी स्वयंपाकघरात नाश्ता-चहा करत रांधणाऱ्या चार बायका, इतक्या सगळ्यांसमोर एका स्टुलावर मुलीला बसवून तिला विचारले जाणारे तेच तेच प्रश्न आणि सगळं भरपेट खाऊन, निरीक्षण करून झाल्यावर ‘नंतर कळवतो’ म्हणत पदरी टाकलेला नकार… हे चित्र खूप जुनं नाही. मुंबईसारख्या शहरात या सगळ्यांची जागा विवाह मंडळं, मॅचमेकिंगच्या संकेतस्थळांनी घेतलेली असली तरी लग्न जुळवणं आणि त्यासाठी मुलगी पाहणं या व्यवस्थेतील मूळ मुद्दे आजही जैसे थेच आहेत. इंटरनेटने जोडल्या गेलेल्या गावांमध्ये तर ते आजही तितकेच भीषण आहेत आणि मुलींच्या, पर्यायाने तिच्या कुटुंबीयांचा असह्य कोंडमारा करणारे आहेत, याची बोचरी जाणीव होते नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट ‘स्थळ’ हा पाहताना.
सचिन पिळगावकर प्रस्तुत ‘स्थळ’ या सिनेमाची संपूर्ण टीम मंगळवार 11 मार्च रोजी वणीकरांच्या भेटीला येत आहे. जत्रा मैदान स्थित दीप्ती टॉकीज मध्ये सायंकाळी 6 वाजता स्थळ सिनेमाच्या प्रमोशनल शो आयोजित करण्यात आला असून मुख्य अभिनेत्री नंदिनी चिकटेसह संपूर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीसाठी राहणार आहे.
विदर्भातील कलाकारांना घेऊन बनविलेल्या स्थळ या सिनेमाची शूटिंग चंद्रपूर, वरोरा, चिमूर, वणी आणि आजुबाजूच्या परिसरात करण्यात आली आहे. निर्माते शेफाली भूषण, करण ग्रोवर, जयंत सोमलकर व रीना मल्होत्रा व जयंत सोमलकर यांनी निर्देशन केलेल्या या सिनेमात मुख्य भूमिका नंदिनी चिकटे हिने पार पाडली आहे. तरी वणीकर प्रेक्षकांनी आपल्या विदर्भातील चाहत्या मराठी कलाकारांची भेट घेण्यासाठी आज सायंकाळी दीप्ती टॉकीज येथे यावं. असे आवाहन टीम ‘स्थळ’ आणि दीप्ती टॉकीज संचालकाने केले आहे.
पहा ट्रेलर –