वणी टाईम्स न्युज : विद्यार्थी हा देशाचा भविष्य आहे. विद्यार्थी योग्य प्रकारे घडला तर देश घडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या यशात अभ्यासिकेचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे गावा गावात अभ्यासिका उभारणे हे माझे ध्येय राहणार आहे. त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न एक लोकप्रतिनिधी म्हणून करणार, असे वचन खा. प्रतिभा धानोरकर यांनी दिले. संजय खाडे फाउंडेशन द्वारा स्थापित महात्मा फुले अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा प्रसंगी सोमवार 12 ऑगस्ट रोजी शेतकरी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते येथील जटाशंकर चौक परिसरात अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शेतकरी मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिवंगत खा. बाळू धानोरकर यांचे वणीमध्ये एक भव्य अभ्यासिका उभारण्याचे स्वप्न होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न या अभ्यासिकेच्या स्थापनेने पूर्ण झाले, याचे समाधान आहे, असे मनोगत संजय खाडे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. वैभव ठाकरे यांनी अभ्यासिका स्थापन करण्यामागणी भूमिका स्पष्ट केली.
आजचे युग स्पर्धेचे आहे. या युगात विद्यार्थी टिकला पाहिजे. विद्यार्थी घडवण्यात अभ्यासिका नक्कीच मोलाचा वाटा उचलेल, असे मनोगत आ. सुधाकर आडबाले यांनी व्यक्त केले. वणी व परिसरातून मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी घडले आहेत. अभ्यासिकेच्या स्थापनेमुळे ही संख्या आणखी वाढेल, अशी आशा डॉ. भालचंद्र चोपणे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.
सोहळ्यात नुकतेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या तसेच 10 वी, 12 वीत विशेष प्राविण्य प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर विजय मुसळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन केले. उत्तम गेडाम यांचा त्यांच्या साहित्यावर लिहिण्यात आलेल्या समिक्षा ग्रंथातील लेख बाबत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, विजय मुकेवार, ऍड देविदास काळे, प्रा. दिलीप मालेकर, प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, विवेक मांडवकर, टिकाराम कोंगरे, प्रशांत गोहोकार, शामा तोटावार, मोरेश्वर पावडे, रवि धानोरकर, पवन एकरे, सुनील वरारकर, गजानन खापने, वसंता आसुटकर, अशोक धोबे, राजेंद्र कोरडे इत्यादी मान्यवरांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचलन प्रदीप बोरकुटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. शंकर व-हाटे यांनी मानले. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने विद्यार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. सोहळ्यानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे सदस्यांनी परिश्रम घेतले…