झरी जामणी : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त झरीजामणी तालुक्यातील अडेगाव येथे 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा शिवजन्मोत्सव आयोजन समिती यांच्या वतीने शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
शिव जन्मोत्सव कार्यक्रमाचा उद्घाटन 18 फेब्रु. रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते होणार आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता प्रसिद्ध सप्त खंजेरी वादक पवनपाल महाराज यांचे समाज प्रबोधन पर कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता गावात शोभा यात्रेसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर रात्री 8 वाजता महिला सक्ष्मीकरण व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर तेजस्विनी गव्हाणे हिचे जाहीर व्याख्यान होणार आहे.
शिव जन्मोत्सव सोहळा उद्घाटन प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून पणन महासंघ मुंबईचे संचालक संजय खाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश ठाकरे, शिवजन्मोत्सव आयोजन समिती विशेष अतिथी अजय धोबे उपस्थित राहणार आहे. यावेळी सत्कारमूर्ती आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार वामनराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकुटबन पो.स्टे.चे ठाणेदार संतोष मनवर यांच्या सह मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष केतन ठाकरे, अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंताचा सत्कार आयोजक समितीतर्फे करण्यात येणार आहे. शिव जन्मोत्सव कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवजन्मोत्सव आयोजन समिती मार्फत करण्यात आले आहे.